कडेगांव: दि.19 मानवी जीवनात व निसर्गात अनेक रहस्ये असून मानवी जीवनातील व निसर्गातील रहस्य उघडणे हेच संशोधनाचे उद्दिष्ट आहे. अनेकांनी मानवी मनाचा व निसर्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप पूर्णपणे मानवी मनाचा व निसर्गाचा शोध घेता आला नाही. म्हणून मानवी मन व निसर्ग अगम्य आहे असे प्रतिपादन प्रा.डॉ.तातोबा बदामे यांनी केले.

ते आर्टस्, अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविदद्यालय अंतर्गत ‘संशोधन पध्दती’ या विषयावर एक दिवसीय आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बापूराव पवार हे होते. यावेळी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कस्टलरचे प्रमुख डॉ.राजेंद्र महानवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समनव्यक प्रा.डॉ.दत्तात्रय थोरबोले, महाविद्यालय रिसर्च कमिटीचे समन्यवक प्रा.डॉ.जयदिप दिक्षित उपस्थित होते. प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समनव्यक प्रा.डॉ.दत्तात्रय थोरबोले यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळा घेण्यामागील उद्देश सांगितले.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.बापूराव पवार म्हणाले की,संशोधन कोणतेही असले तरी ते संशोधन अचूकपणे केले पाहिजे. मानवाची जी प्रगती झाली ती संशोधन क्षेत्रामुळेच झाली आहे. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून संशोधन प्रक्रिया ही मानवी जीवनासाठी नवसंजीवनी आहे. असेही प्राचार्यानी सांगितले. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आशा सावंत यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. डी.ए.पवार यांनी केले. संशोधन पद्धती या एक दिवसीय कार्यशाळेत बोलताना प्रो. डॉ. तातोबा बदामे, प्र. प्राचार्य डॉ. बापूराव पवार व प्राध्यापक व या कार्यशाळेसाठी कडेगांव, पलूस, भिलवडी, बोरगांव या महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिंनी व प्राध्यापक वृंद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.