बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. पंधरा वर्षांचा मुलगा शेतातून गेला म्हणून त्याला मारहाण करून आधी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला.
ही घटना नित्रुड परिसरात मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख असं या मुलाचं नाव आहे. या प्रकरणा कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड या ठिकाणी १५ वर्षांचा एक विद्यार्थी नववीत शिकत होता. मंगळवारी सकाळी ७ च्या दरम्यान गुलाम मोहम्मद हा बहीण सिमरन आणि छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणायला गेला होता. त्याचवेळी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलामला रस्त्यात अडवलं आणि आमच्या शेतातून का जातोस? असं विचारत त्याला मारहाण केली.
सरपणासाठी गुलामने जी ओढणी सोबत आणली होती त्या ओढणीनेच या तिघांनीही त्याचा गळा आवळला. हा सगळा प्रकार पाहून गुलामची बहीण सिमरन आणि लहान भाऊ हुजैफा हे दोघंही घाबरले. त्यांनी पळत घर गाठलं आणि सगळ्यांना हा प्रकार सांगितला.
त्यानंतर घरातल्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पालखी महामार्गावरच्या नित्रुडपासून हाकेच्या अंतरावर गुलामचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळाला. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह झाडावरून उतरवला आणि शवविच्छेदनासाठी माजलगावच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.