सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या दोन ठिकाणी एमआयडीसी सुरु करण्याला मंगळवारी उद्योग विभागाने तत्वता मान्यता दिली आहे. तसेच, मजले येथे नियोजित ड्राय पोर्टसाठी लागणारी जमीन एमआयडीसी मार्फत महामार्ग प्राधिकरणला हस्तातरीत करण्याचा निर्णायही घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये खासदार माने यांच्या मागणी नुसार आयोजित बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, एमआयडीसीचे बिपिन शर्मा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सांगली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानीधि, भाऊसाहेब आवळे उपस्थित होते.

आष्टा येथे एमआयडीसी होण्याच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या जुन्या मागणीला प्रतिसाद मिळाला आहे. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकारी यासाठी जागेची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.