डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध लाभार्थीना मिळणार विहरीसाठी लाखो रुपयांचे अनुदान
सोलापूर: अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०२२-२३ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ५१८ लाभार्थींना लाभ दिला आहे. त्याअंतर्गत रक्कम रुपये ४ कोटी ४३ लाख अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांनी दिली.
राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजार रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रुपये, इनवेल बोअरिंग व पंपसंचासाठी प्रत्येकी २० हजार रुपये, वीजजोडणी आकार १० हजार रुपये, तसेच सूक्ष्म सिंचन संचअंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपये किंवा तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपये या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध संवर्गातील असावा. शेतकऱ्याच्या नावे किमान ०.२० हेक्टर व कमाल ६ हेक्टर मर्यादित जमीन असावी. नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर स्वतःच्या नावे किंवा एकत्रित कुटुंबाची सामूहिक जमीन असावी. नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्याकरिता किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
दरम्यान, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा २०२२-२३ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील १८ लाभार्थींना लाभ देण्यात आला असून १०.९० लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.