पुणे: गळ्याभोवती मांजाचा फास आणि जणू बेड्या घालाव्यात असे जखडलेले पाय अशा मरणासन्न अवस्थेतून ‘राखी सातभाई’ पक्ष्याने मंगळवारी सकाळी आकाशात भरारी घेतली. शाळेतही न जाणाऱ्या चार ते पाच वर्षे वयाच्या चार चिमुकल्यांनी सुंदराबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांच्या मदतीने या पक्ष्याला जीवनदान दिले.
ग्रे बाबलेर म्हणजे राखी सातभाई नावाचा चिमणीसारखा दिसणारा सतत आपल्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत निसर्गाची शोभा आणि फिरणाऱ्यांना आनंद देणारा पक्षी. गळ्याभोवती, दोन्ही पायाभोवती मांजा अडकून बसलेल्या फासाने जमिनीवर पडला होता. त्या माळरानावर खेळत असणारी कृष्णा राठोड, वैष्णवी राठोड, पूजा राठोड आणि सोनाली राठोड या साधारण एकाच वयाच्या बालकांचे या पक्षाकडे लक्ष गेले. जवळच फिरत असलेल्या मांजर आणि कुत्र्यापासून आधी त्यांनी या पक्ष्याचे रक्षण केले. त्यांच्यापैकी कृष्णा राठोड याने तेथून फिरण्यासाठी जात असलेले संजय सोमवंशी यांना बोलावून पक्षी होता त्या ठिकाणी आणले.

धाडसाने पक्ष्याला हातामध्ये घेऊन कात्रीने त्याच्या पायाला आणि मानेला मांजापासून मोकळे केले. झोपडीत राहणाऱ्या लहान मुलांनी पक्ष्याला पाणी पाजले. त्याच्या मानेला आणि पायांना मांजा लागून दुखापत झाली होती. तेथे हळद लावली. पाणी पिऊन ताजातवाना झालेला पक्षी पुन्हा एकदा स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी उडून गेला.