मुंबई : राज्यामध्ये अवकाळीचे संकट सुरु असतानाच आता पाच जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये १३ एप्रिलनंतर सोमवारी पाचव्या दिवशी कमाल ४३.३ अंश नोंदवले गेले. एप्रिलच्या उर्वरित १३ दिवस तापमानाचा ४२ ते ४७ अंशांदरम्यान राहील. प्रामुख्याने २९ एप्रिल रोजी ते उच्चांकी ४७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० पार केल्याने मोठ्या प्रमाणावर उकाडा आहे. यामुळे विजेच्या वापर देखील अधिक वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत मिळालेला दिलासादायक काळ संपुष्टात आला असून, वातावरण स्वच्छ होताच सूर्याचा रुद्रावतार बघावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, रविवारी 41 अंशांवर असलेला पारा सोमवारी मात्र थेट 41.8 अंशावर गेला होता.
