मुंबई : राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आधीच संकटात सापडलेला बळीराजा पावसासह तापमान वाढीच्या इशाऱ्यामुळं चिंताग्रस्त झाला आहे.
