छत्रपती संभाजीनगर येथे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची सभा : अनेक माजी आमदार, खासदार भारत राष्ट्र समितीमध्ये करणार प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी संघटनेतील काही कार्यकर्ते, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले अनेक नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असून ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे २४ एप्रिल रोजी ‘ बीआरएस’च्या जाहीर सभेचे आमखास मैदानात आयोजन करण्यात आले आहे.
कन्नड-सोयगाव मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादीमध्ये काम करणारे कदीर मौलना, गंगापूर मतदारसंघातील अण्णासाहेब माने यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना बरोबर घेत सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेस चंद्रशेखर राव मार्गदर्शन करणार आहेत.

सीमावर्ती भागातील काही नेते भारत राष्ट्र समितीच्या हाती लागतील असे मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे शंकर अण्णा धोंडगे, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे यशपाल भिंगे यांच्यासह शेतकरी संघटनेतील नेत्यांना या पक्षाचे वेध लागले. त्यांनी ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश केला आहे.