मुंबई : आम्हा सर्व कलाकारांची इच्छा आहे की चित्रपटसृष्टीची ओळख ही मराठी चित्रपटच असली पाहिजे”, असे मत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले“. भारताची चित्रपटसृष्टी ही मराठी चित्रपटसृष्टीतून उभी राहिली. जिओ स्टुडिओजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जिओ स्टुडिओ या ओटीटी वाहिनीने पहिल्यांदाच हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमधील, वेगवेगळ्या धाटणीच्या १०० चित्रपट आणि वेब मालिका प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. भारतातील प्रत्येक भाषा, संस्कृती यांची गोष्ट मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचे जिओ स्टुडिओजच्यावतीने सांगण्यात आले.

याशिवाय नव्या वेब मालिका भारतातील स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटही जिओ स्टुडिओजच्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित केले जाणार आहेत.
यात ‘बाईपण भारी देवा’, ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’, या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, ‘फोर ब्लाइंड मेन’, ‘वनटूथ्रीफोर’, ‘खरवस’, ‘काटा किर्रर्र’, ‘खाशाबा’, या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटांची मांदियाळी प्रेक्षकांना अनुभवता येईल. याशिवाय ‘कालसूत्र’, ‘एका कलेचे मणी’, ‘अगं आई अहो आई’, या मराठीतील प्रीमियम वेब मालिकांचाही समावेश आहे.