नागपूर : मित्र असलेले दोन शाळकरी विद्यार्थी पोहण्यासाठी तलावात गेले आणि बुडाले. ही घटना कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली शिवारात गुरुवारी (दि. १३) दुपारी घडली असून, सायंकाळी उघडकीस आली. दोघांचेही मृतदेह रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास तलावातून बाहेर काढण्यात आले.
लावण्य ज्ञानेश्वर जीभकाटे (वय १३) व साहील श्रीराम जीभकाटे (१५, दोघेही रा. सिल्ली, ता. कुही) अशी मृतांची नावे आहेत.
लावण्य हा कुही शहरातील रुख्खडाश्रम पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत, तर साहील सिल्ली येथील स्व. संतोषराव रडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायचा. एकाच गावचे असल्याने दोघेही मित्र होते.

लावण्यच्या शाळेला सुट्या लागल्या असून, साहीलची सकाळची शाळा असल्याने दोघेही गुरुवारी दुपारी सायकलने सिल्ली शिवारात तलावाकडे फिरायला गेले होते.
हा तलाव गावापासून अंदाजे अर्धा किमी अंतरावर आहे. त्यांनी सायकली तलावाच्या काठी उभ्या केल्या आणि तलावात पोहायला सुरुवात केली. खोल पाण्यात गेल्याने दोघेही बुडाले. परिसरात कुणीही नसल्याने हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही. सायंकाळी नागरिकांना तलावाच्या काठी दोन सायकली आणि कपडे आढळून आल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी लगेच कुही पोलिसांना सूचना दिली.
रात्री ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही पाण्यात शोध घ्यायला सुरुवात केली. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दोघांचेही मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.