बीड : आज 14 एप्रिल संपुर्ण देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. ऐन जयंती दिनीच धारुर शहरातील अंबाजोगाईकडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा जागिच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मयत तरुणाचे नाव प्रेमनाथ दादाराव गालफाडे (वय 26) तर जखमी तरुणाचे नाव प्रवीण अंकुश लोखंडे (वय 26) असे आहे. दोघे तरुण आवरगाव येथील रहिवासी असुन धारुरहून आवरगावकडे आपल्या मोटारसायकलवरुन निघाले होते.

धारुरहून अंबाजोगाई व लातूरकडे जाणारा हा राज्य रस्ता अत्यंत खराब व जर्जर अवस्थेत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात सतत अपघात होत असतात.
आजही दि.14 रोजी मोटारसायकलला (क्र.एमएच 11 सीएफ 6317) अज्ञात पिकअपने वळणावर धडक दिली. यात एक तरुण ठार झाला तर आवरगावचे माजी सरपंच अंकुश लोखंडे यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. मयताचे शव धारुर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. ऐन डॉ. आंबेडकर जयंती दिनी अपघातात तरुणाला नाहक जिव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.