माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १३ एप्रिल २०२३ : मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे भीमा नदीत बुडून एकाच कुटुंबातील दोन मुले आणि दोन महिला अशा चारजणांचा मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. चारही मृत परप्रांतीय गुरखा समाजातील आहेत. मृतांची नावे सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. गुरखा कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यात सिध्दापूर येथे वास्तव्यास होते. या कुटुंबातील पुरूष रात्री मंगळवेढा व परिसरात गस्त घालून उपजीविका चालवितात.
नेहमीप्रमाणे या गुरखा कुटुंबातील महिला कपडे धुण्यासाठी नजीकच्या भीमा नदीवर गेल्या होत्या. त्यांच्या सोबत लहान मुलेही होती. नदीच्या काठी खेळत खेळत पाण्यात गेली. परंतु नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना महिलांच्या लक्षात आले. मुलांचे प्राण वाचविण्यासाठी दोन महिलांनी पाण्यात उड्या मारल्या आणि मुलांसह या महिलाही वाहून गेल्या. सायंकाळी उशिरा चारही जणांचा शोध घेण्यात आला. बेशुध्दावस्थेत सर्वांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता चौघाहीजणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.(स्त्रोत : लोकसत्ता)
