पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात.
महापालिका प्रशासनाने नुकत्याच १३२ कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्या केल्यानंतर अजून ६४६ सेवकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश आहे. या बदल्यांची तसेच पदस्थापनेची कार्यवाही १७ एप्रिलला केली जाणार आहे.

अशा बदल्या करणेविषयीच्या धोरणानुसार ३१ मार्च २०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या लेखनिक संवर्गातील प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या तसेच लेखनिक संवर्गातील उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक व अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता या पदाच्या पदस्थापना करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.