राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर गुन्हा दाखल : जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दुसऱ्या मुलाविरोधातही फिर्याद दिली आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हाची नोंद आहे. क्षीरसागर बंधूंवर कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.कौटुंबिक कारणावरून संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघा भावांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्याचा प्रकार घडला आणि या वरून स्वतः रवींद्र क्षीरसागरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर बीडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.