माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १२ एप्रिल २०१४ : खानापुर : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने खानापूर तालुक्यातील अनिल निवृत्ती माने यांच्याकडील दुध संकलनाची तपासणी केली. या कारवाईत दुध व्यवसायिकाकडून सर्व अन्न पदार्थ व भेसळकारी पदार्थांचे नमुने विश्लेषणाकरीता घेवून रिफाईन्ड सोयाबीन ऑईल व डेअरी परमिएट पावडरचा उर्वरीत साठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. तसेच गाय व म्हैस दुध व भेसळकारी सोल्युशनचा साठा नष्ट करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे देण्यात आली.
तपासणीवेळी दुध संकलनामध्ये तसेच अनिल माने यांच्या राहत्या घरी व गोदामामध्ये दुधामध्ये भेसळीकरीता वापरले जाणारे रिफाईन्ड सोयाबीन ऑईल 150 कि.ग्रॅ., किंमत 25 हजार 665 रूपये, डेअरी परमिएट पावडर 70 कि.ग्रॅ., किंमत 9 हजार 800 रूपये, भेसळकारी सोल्युशन 105 लि., किंमत 5 हजार 450 रूपये, गाय दुध 88 लि., किंमत 3 हजार 80 रूपये, म्हैस दुध 800 लि., किंमत 40 हजार रूपये याचा साठा आढळला. अनिल माने यांचे दुध संकलन केंद्र व गोदाम सिल करण्यात आले. पुढील तपासामध्ये खानापूर येथील मे. उदयकुमार रामलिंग कोरे या पेढीमधून दुध संकलन केंद्रास रिफाईन्ड सोयाबीन ऑईलची विक्री झाले असल्याचे निष्पन्न झाल्याने मे. उदयकुमार रामलिंग कोरे या पेढीची तपासणी करून रिफाईन्ड सोयाबीन ऑईल चा नमुना विश्लेषणाकरीता घेवून उर्वरीत 46 हजार 195 रूपये किंमतीचा 283 किलो 400 ग्रॅमचा साठा साठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पवार, श्री. कोळी, श्री. केदार व नमुना सहायक श्री. कवळे यांच्या पथकाने केली. अनिल माने हे संकलन केलेले गाय दुध व म्हैस दुध तासगाव तालुक्यातील निमणी येथील मिल्क शाईन फुड्स प्रा.लि. या शितकरण केंद्रास विक्री करीत असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. स्वामी, श्रीमती फावडे व श्रीमती हिरेमठ यांच्या पथकाने सदर शितकरण केंद्राची तपासणी करून गाय दुध व म्हैस दुध या अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणाकरीता घेतले. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) श्री. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरीकांना अन्न भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी 0233-2602202 या दूरध्वनीवर किंवा 1800222365 या राज्यस्तरीय टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.