छत्रपती संभाजीनगर: रॅपर राज मुंगासे यांने ’50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी’ अशा शब्दांचा वापर करून रॅप गाणे तयार केले होते. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केल्यानंतर राज्यभर तुफान व्हायरल झाले. मात्र, यानंतर त्याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून राज गायब झाला होता. तो नेमका कुठे आहे? याची माहिती कोणलाही नव्हती. परंतु त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. अंबादास दानवे यांनीच आज फेसबुकवर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे.

माध्यमांसमोर आलेल्या राजने सांगितले की, त्याला अटक झाली नव्हती. त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता, त्यानंतर पोलीस त्याच्या घरीही गेले होते. तो रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशाप्रकारे त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचेही त्याने सांगितले. पण मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही, कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही 50 खोके घेतलेच नसतील तर तुम्ही ते स्वत:वर ओढून का घेत आहात? मी फक्त ‘चोर’ असा उल्लेख करत गाणं बनवलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुमच्या मनाला लागणं सहाजिक गोष्ट आहे, असे राज म्हणाला.