माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ०७ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी फरार असलेला आरोपी संतोष धोंडीराम ढेमरे (वय ३९ रा.आटपाडी) याला सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे अटक केल्याने गुंतवणूकदार यांना दिलासा मिळाला असला तरी, एक “संतोष” सापडला दुसरा कधी सापडणा? असा सवाल गुंतवणूकदार करत आहेत.
आटपाडी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. येथील आम जनता ही पूर्वी माथाडी कामगार, ऊसतोडी करून गुजराण करत होती. परंतु कालांतराने नागरिकांना गलाई व्यवसायाद्वारे आर्थिक बस्तान बसविण्यास सुरुवात केली. तर काहींनी शेतीच्या माध्यामातून डाळींबाद्वारे उन्नतीचा मार्ग शोधला. त्यामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता वाढली.

सर्वसामान्य नागरिक यांच्याकडे आर्थिक सुबत्ता वाढत गेल्याने त्यांनी पैसे इतर व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अन त्यातून तालुक्यात शेअर मार्केट चा बोलबाला सुरु झाला. लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून महिन्याकाठी सुरुवातीला १५ ते २० हजार रुपये मिळू लागले. त्यामुळे सहाजिकच याची “माउथ पब्लिसिटी” झाली. गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आपल्या पै-पाहुण्यांना या योजनेची माहिती देत, या योजनेमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे दोन्ही “संतोष” कडे गुंतवणूक कोटी रुपयामधून येवू लागली.
परंतु चैन साखळीमध्ये एक जरी साखळी तर चैन तुटते, तशीच चैन दोन्ही “संतोष” ची तुटली अन गुंतवणूक केलेल्या लोकांना महिन्याचा मिळणारा परतावा हळूहळू थांबू लागला. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही संतोष तालुक्यातून गायब झाले.
सुरुवातीच्या काळात दोन्ही संतोष ची बाजू त्यांच्या हितचिंतकांनी सांभाळून नेत याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु जस-जसे दोन्ही “संतोष” माघारी येण्याची चिन्हे दिसेना झाल्यावर हेच हितचिंतक त्यांची सोशल मीडियातून त्यांना विविध मिम्स द्वारे त्यांची अब्रू काढू लागले.
गुंतवणूक केलेल्यांना महिन्याचा परतावा मिळायचा बंद झाल्याने तसे गुंतवणूकदारांचे थाबे दणाणले. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी पोलीस ठाणेमध्ये आपल्या तक्रारी दिल्या.
सुरुवातीच्या काळात पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केला. परंतु जसजसा दबाव वाढू लागला तसे गुन्हे नोंद होवू लागले. सुरुवातीला संतोष ढेमरे याच्यावर गुन्हा नोंद झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. परंतु ज्या गुंतवणूदारांनी संतोष अडसूळ कडे पैसे गुंतवणूक केले आहे तो अद्याप ही फरार असल्याने त्याला कधी अटक होणार? याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. (क्रमशः)