आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी फरार असलेला आरोपी संतोष धोंडीराम ढेमरे (वय ३९ रा.आटपाडी) याला सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी येथे व्ही.एच.एस.ट्रेडर्स आणि एल.एल.पी. या कंपनीच्या भागीदारांनी आटपाडी परीसरातील लोकांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करुन अधिक परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवले. ठेवीदार लोकांकडून रोख स्वरुपात ठेव रक्कम स्विकारली. या गुंतवणुकदारांना कंपनीने चेक, ठेव पावत्या दिल्या आहेत. परंतु कंपनीने ठेवीदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांना कोणताही ठेव परतावा न देता १ कोटी २७ लाख रुपयांची फसवणुक केली. याबाबत बाबत २८ फेब्रुवारी रोजी संतोष धोंडीराम ढेमरे, संदीप धोंडीराम ढेमरे, विनोद दादासो कदम आणि हारुण इस्माईल तांबोळी सर्व रा.आटपाडी यांच्या विरुध्द आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील रक्कम व व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष धोंडीराम ढेमरे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र फरार असलेल्या ढेमरे याचा शोध सुरु होता. तो पुणे शहरात बिबवेवाडी येथे असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार अमोल लोहार, इरफान पखाली,उदय घाडगे, पोलीस नाईक विनोद कदम, दिपक रणखांबे, कुलदीप कांबळे, दिपाली पाटील यांनी आरोपीस अटक केली.
दरम्यान व्ही.एच.एस.ट्रेडर्स आणि एल. एल.पी.या कंपनीच्या भागीदारानी शेअर मार्केट मधुन अधिक परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवुन कोणाची फसवणुक झाली असल्यास संबंधितांनी सर्व कागदपत्र घेवून आर्थिक गुन्हे शाखा सांगली, पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधावा असे आवाहन सुधीर पाटील यांनी केले आहे.