मंत्रालयासमोर विषप्राशन करुनआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई करा, अशी तक्रार संगीता यांनी केली होती. मात्र या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी थेट मंत्रायलासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यावेळी पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीच्या वेळी भरधाव इनोव्हा कारने थेट बॅरिगेट्स तोडले होते. याच भरधाव गाडीखाली संगीता यांचे पती चिरडले गेले होते. या भीषण अपघातात संगीता यांचे पती गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल होती. नेरुळ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात गंभीरता दाखवली नाही आणि कारचालकाला सोडून दिले होते.

संगीता यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करा यासाठी संगीता यांनी राज्य सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पती काम करत असलेल्या पोलीस विभागाकडूनच न्याय मिळत नाही हे पाहून त्यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यालाही सरकारने गंभीर घेतलं नाही. त्यामुळे अखेर त्यांनी मंत्र्यालयासमोर जाऊन विषप्राशन केले. अखेर उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.