कोल्हापुर : श्री संत बाळूमामा ट्रस्ट आदमापूर च्या विश्वस्तांमधील दोन गटांत सोमवारी दुपारी प्रतिभानगर परिसरात फ्री स्टाईल हाणामारी झाली. वादाबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी हे सर्व एकत्र आले होते. मात्र त्यांच्यातच हाणामारी झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणार्याे बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
बाळूमामा मंदिराच्या ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात सरपंच विजय गुरव हे वकिलांची भेट घेण्यासाठी आपल्या समर्थकांसोबत कोल्हापुरात आले होते. त्याचवेळी मानद ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले हेही आपल्या समर्थकांसोबत आले.

ट्रस्टवर नव्या नेमणुकीवरील वादातून गुरव व भोसले समर्थकांत जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी परस्परांना मारहाण करत चप्पल हातात घेऊन एकमेकांना चोप दिला. 2003 साली श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. ट्रस्टमध्ये सुरुवातीला 18 विश्वस्त होते. यापैकी 6 विश्वस्तांचा मृत्यू झाला. गेल्याच महिन्यात कार्याध्यक्ष राजाराम मगदूम यांचेही निधन झाले. सध्या 12 विश्वस्त कार्यरत आहेत. नव्या विश्वस्तांच्या नेमणुकीचा वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे.