IPL 2023 : RR vs SRH : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेत राजस्थानचा रॉयल ने विराट विजय प्राप्त करत, हैदराबादच्या नवाबांना फिके पाडले. राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादवर तब्बल ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, हैदराबाद केवळ १३१ धावाच करू शकली.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी शून्यावर दोन विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी भोपळाही न फोडता माघारी परतले. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्यांना बाद करून हैदराबादला दुहेरी धक्का दिला. यानंतर युझवेंद्र चहलने हॅरी ब्रूकला बाद करून हैदराबादला तिसरा धक्का दिला. ब्रूकने १३ धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदरही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. अश्विनने ग्लेनला बाद केले, सलामीवीर मयांक अग्रवाल याने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला मात्र २३ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारला बाद करून चहलने सामन्यातील चौथी विकेट पूर्ण केली. यानंतर अब्दुल समद आणि उमरान मलिक यांनी काही मोठे फटके मारले. मात्र संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी दणका दिला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी झाली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात जोस बटलर २२ चेंडूत ५४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यशस्वी जैस्वालने कर्णधार संजू सॅमसनसोबत अर्धशतकी भागीदारी केली. यशस्वी ३७ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कलला उमरान मलिकने क्लीन बोल्ड केले. रियान पराग ७ धावा करून बाद झाला. हेटमायर आणि अश्विन यांच्यात सहाव्या विकेटसाठी ९ चेंडूत १६ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे राजस्थानच्या संघाला २०० चा टप्पा पार करता आला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखने प्रत्येकी दोन, तर उमरानला एक विकेट मिळाली.