माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ३१ मार्च २०२३ : सांगली : सामाजिक न्याय विभागामार्फत सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रमाई आवास (घरकुल) योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रस्ता, सांगली येथे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
हे ही वाचा :- लग्नासाठी तयार होत नसल्याने तृतीयपंथीयाने केला 23 वर्षीय युवकाचा खून

या योजनेचा उद्देश राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्के घर तसेच कच्च्या घराचे पक्के बांधकाम करण्याकरीता तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदीस अनुदान उपलब्ध करुन देणे आहे. यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती किंवा नवबौध्द संवर्गातील असावा, लाभार्थीचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे व अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा (महानगरपालिका क्षेत्रासाठी) 3 लाख रूपये पर्यंत आहे. जागेचा 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र, जातीचे प्रमाणपत्र, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रक्कम रु. 3.00 लक्षच्या आतील), रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, घरपट्टी/ पाणीपट्टी/ वीजबिल यापैकी एक (3 महिन्याच्या आतील) आवश्यक, महानगरपालिका यांच्याकडील बांधकाम परवाना.
हे ही वाचा :- महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी मिळणार २० लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान
या योजनेंतर्गत घर बांधकामाचे चटई क्षेत्र किमान 269 चौ. फुट राहील. अनुदान 2 लाख 50 हजार रूपये (तीन टप्प्यामध्ये) इतके असून अनुदानाचे वितरण घराचे बांधकाम सुरू करताना 50 टक्के, सुरू झालेल्या बांधकामाचा मुल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यानंतर 40 टक्के व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर 10 टक्के करण्यात येते, असे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
हे ही वाचा :- संयोगीताराजेंचा आरोप : नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी केला मज्जाव : नवा वाद निर्माण