हिंगोली: हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील अशोक गजानन आठवले (२३) हा युवक मागील काही वर्षांपासून शहरात ऑटो चालण्याचा व्यवसाय करीत होता. यातच त्याची ओळख खुशालनगर भागातील प्रिया उर्फ दीपक नरसिंग तुरमळू या तृतीयपंथियासोबत झाली. तीन महिन्यापूर्वी अशोक खुशालनगर भागातील प्रियाच्या घरी राहायला आला.
ते एकाच घरात राहू लागल्यानंतर प्रियाने अशोकला लग्नासाठी गळ घातली. अशोक मात्र या नात्याला कोणतेही भवितव्य नसल्याचे सांगून प्रियाला टाळत होता. यावरून गुरुवारी त्या दोघांमध्ये खडाजंगी झाली. प्रियाने ३० रोजी रात्री हिंगोली शहरातील हरण चौक भागात राहणाऱ्या शेख जावेद शेख ताहीर कुरेशी याला बोलावून घेतले.

त्यांनी अशोकचा गळा आवळून त्याला जीवे मारले. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र अशोकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत मयताचा भाऊ देविदास आठवले यांच्या तक्रारीवरून प्रिया व शेख जावेद या दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.