Latest Marathi News

BREAKING NEWS

शारदाताई हिलगे : वारसा जपणारी मास्टरमाईंड

0 528

कला हेच आपले जीवन म्हणून अहोरात्र कलेवरती प्रेम करणारे सुभाष हिलगे व प्रकाश हिलगे या भावंडांनी वैभव आर्केस्ट्रा ची निर्मिती केली. महाराष्ट्रभर वैभव आर्केस्ट्रा चे कार्यक्रम करून अनेक दिग्गज कलाकार यामध्ये दिनकर इनामदार, नंदा शिंदे, शिवराज चौगुले, विजय दळवी अशा जुन्या कलाकारांना बरोबर घेऊन त्याच बरोबर नवोदित कलाकारांनाही वैभव आर्केस्ट्रा मध्ये संधी दिली आणि त्यांचा प्रवास 45 वर्ष हा सतत चालू आहे. वैभव आर्केस्ट्रा कोल्हापुर म्हटलं की लोकांना तो आर्केस्ट्रा आपला वाटतो.

तो वारसा पुढे चालवण्याचं काम शारदाताई हिलगे या करत आहेत. सुभाष हिलगे व प्रकाश हिलगे हे जरी अनंतात विलीन झाले असले तरी त्यांचं नाव पुढे चालवण्याचं काम ह्या शारदाताई करत आहेत. शारदाताई ह्या वैभव आर्केस्ट्रा चे वर्षभरात 200 च्या आसपास कार्यक्रम करत आहेत.

Manganga

शारदाताई महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ,गुजरात, तामिळनाडू, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये वर्षभर 200 च्या आसपास कार्यक्रम करत आहेत. वैभव म्हटलं की, महिलांची गर्दी ही नक्कीच बघायला मिळते. कारण महिलांना वाटतं वैभव आर्केस्ट्रातील जे नाटक सादरीकरण केलं जाते ते नाटक आपण नक्की बघितलं पाहिजे. त्यातील कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यामुळे वैभव आर्केस्ट्रा हा आपला आर्केस्ट्रा असल्याची प्रेक्षकांना जाणीव होत राहते. नवनवीन येणारे हिंदी, मराठी गीते हे यामध्ये घेतली जातात. नव तरुणाई या गाण्यावर बेधुंद आनंद घेत असते. या ऑर्केस्ट्रातील मिस ज्योती या डान्स आर्टिस्टचा नाद एकच बैलगाडा शर्यत हा डान्स खूप व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या सुद्धा या कार्यक्रमातील महत्वाच्या सेलिब्रेटी असतात.

नुकताच शारदाताई हिलगे यांनी सांगितले की सुभाष हिलगे व प्रकाश हिलगे या दोघांना महाराष्ट्र शासनाचा मरणोत्तर चित्र गौरव पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल शारदाताई हिलगे यांचा सत्कार शेटफळे गावचे उपसरपंच विजय देवकर, बालाजी इव्हेंट्स चे सर्वेसर्वा बालाजी पावले, बिरू बंडगर, अक्षय पाऊले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना उपसरपंच विजय देवकर म्हणाले, ज्यावेळी शारदाताईंना भेटलो त्यांनी दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याचे सांगितलं आणि दहा वर्षापासून त्या हे सर्व सांभाळत आहेत. एक महिला रोज एका नव्या गावामध्ये जाऊन आपल्या कलाकारांच्या बरोबर सादरीकरण करणं आणि तिथल्या लोकांची मने जिंकणे ही गोष्ट काही सोपी नाही. वेगवेगळ्या अडचणी वरती मात करत कला हेच आपले दैवत मानून त्या महाराष्ट्रभर कार्यक्रम करत आहेत.

वैभव च्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रामध्ये ही या दोन्ही भावंडांनी पाऊल ठेवले आणि माहेरची पाहुणी, काळुबाईच्या नावानं चांगभलं, भाजीवाली सखू, हवालदार भिकू असे तीन चित्रपटाची निर्मिती केली. कलेचा हा वारसा पुढे चालवत ध्येय, जिद्द ,चिकाटी, कर्तुत्व संपन्न, धाडसी आणि कले वरती नितांत प्रेम असणाऱ्या शारदाताईंना मानाचा मुजरा करायलाच हवा. कारण एक स्त्री जेव्हा सक्षमपणे पाऊल उचलते तेव्हा मानवी समाजाची विकासाच्या दृष्टीने वाटचाल होते.

हे ही वाचा 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!