यवतमाळ : येथील बाळदी रोडवरील आयटीआय कॉलेजच्यामागे एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत झुडपात मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गोपाल सुधाकर मिरासे (२५), रा. बाळदी, असे ओळख पटलेल्या मृताचे नाव आहे. १ मार्चपासून गोपाल बेपत्ता होता, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. तो १ मार्च रोजी बाळदी येथून गेला होता. नंतर परत आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठून गोपाल बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. रविवारी आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे त्याचा मृतदेहच आढळून आला.
परिसरातील एक व्यक्ती शौचास गेला असताना झुडपातून दुर्गंधी येत होती. याबाबत त्या व्यक्तीने नागरिकांनी माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. लोच ठाणेदार अमोल माळवे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. तेव्हा झुडपात कुजलेला मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने ओळख पटविली असता मृतदेह गोपाल मिरासेचा असल्याचे निष्पन्न झाले.गोपालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सी.एम. चौधरी व अमोल राठोड करीत आहे.