नवी मुंबई : सिमेंटच्या ब्लॉकने डोकं ठेचून महिलेची हत्या झाल्याची घटना तुर्भे एमआयडीसी भागात घडली आहे. सुमारे ३० ते ३५ वयोगटातली ही महिला असून तिची ओळख पटलेली नाही. दरम्यान तिच्या अंगावरील दागिने तसेच असल्याने लुटीच्या उद्देशाने हा प्रकार झालेला नसून हत्येमागे वेगळे कारण असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अडवली भुतवली ग्रामस्थांच्या गावदेवी मंदिराच्या मार्गालगत हा प्रकार घडला आहे. बुधवारी परिसरातील काही व्यक्ती देवीच्या दर्शनासाठी मंदिरात चालल्या होत्या. यावेळी पाऊल वाटेपासून काही अंतरावर एक महिला पडलेली असल्याचे त्यांनी पाहिले.

घटनास्थळाचा पाहणीत सदर महिलेच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारला असल्याचे दिसून आले. शिवाय हा ब्लॉक त्याठिकाणी पडलेला देखील आढळून आले. मात्र महिलेची ओळख पटेल असे काही तिच्याकडे आढळून आले नाही. त्यानुसार या अज्ञात महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.