माणदेश एक्सप्रेस न्युज I दि. १४ मार्च २०२३ I म्हसवड : सातारा पंढरपूर रस्त्यावर शासनामार्फत सुमारे १३०० कोटी रुपये खर्चून 2016 पासून रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातील अंदाजपत्रकात जुन्या अस्तित्वात असलेल्या पुलांची मजबुती करून वाहतुकीस सुरळीत करावयाचे आहे अशा बाबी आहेत.
तेराशे कोटी रुपये खर्चाचे कामास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कित्येक वेळा भेटी झाल्या असतील. त्यावेळी ठिकठिकाणी जुन्या पुलांवर वाढलेली झाडी तोडावयाची असती ही बाब दुर्लक्षित केलेने त्या पुलांचे आयुष्यमान कमी होणार आहे. वास्तविक ब्रिटिश आमदानी पासून पीडब्ल्यूडी खात्यामार्फत पुलांची व मोरयांची पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर परीक्षण करून देखभाल व दुरुस्ती करावयाचे असते या बाबी अलीकडे झाल्याचे दृष्टिक्षेपात येत नाही झाले असते तर माणगंगा नदीवरील पुलाचे दगडी बांधकामातून एका वृक्षाने डेरेदार स्वरूप धारण केले नसते. किंबहुना वरिष्ठांनी वेळीच हि बाब अधिनस्त कर्मचाऱ्यांचे लक्षात आणून दिली असती तर पुलाचे संभाव्य होणारे नुकसान टळले असते.

अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व पुलांवरील खाली वर आजूबाजूस वाढलेली झाडे तोडून घ्यावीत व संबंधित पुल व मोरयांचे आयुष्यमान वाढवावे. खात्यामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट या गोंडस नावाखाली पुलांचे अजून किती आयुष्यमान आहे हे पाहिले जाते त्यावेळी अशा बाबी लक्षात कशा आल्या नाहीत? याबाबत सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे (Eng Sunil Pore, Mhaswad) यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
तसेच याचं रस्त्याचे रेंगाळलेले काम सुरू व्हावे म्हणून आमदार जयकुमार गोरे (jaykumar Gore) यांचे माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पर्यंत तक्रारी करूनही झारीतील शुक्राचार्य कागदी घोडे नाचवत काम रेंगाळत ठेऊन त्याचा त्रास सामान्य जनतेस होत असल्याचे लक्षात येताच इंजि.सुनील पोरे यांनी २६ जानेवारी २०२३ आमरण उपोषण केले होते तेव्हा कुठे ही मंडळी खडबडून जागे झाले व काम रात्रंदिवस सुरू आहे. त्यात सुध्दा वेळचे वेळी काँक्रीटवर पाणी मारण्यास चालढकल होत आहे व धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाणी मारावे या बाबीकडे देखील अद्याप चालढकल होत असल्याने वेळीच या बाबीची वरिष्ठांनी दखल घेऊन आवश्यक त्या बाबी पूर्ण कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.