माणदेश एक्सप्रेस न्युज I ११ मार्च २०२३ I सांगली : सध्या कृष्णा-वारणा नदीत प्रदूषीत पाण्यामुळे प्रचंड मासे मृत होत आहेत. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली महापालिकेच्या दारात मृत मासे टाकण्यात आले. तसेच यावर उपाय योजना न झाल्यास आयुक्तांच्या आणि प्रदूषण नियत्रण कार्यालयात मृत मासे टाकणार असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी प्रशासनास दिला आहे.
अंकली, उदगाव, ऐतवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत. साखर कारखाने, शेरीनाला यातून प्रदूषित व केमिकल युक्त पाणी कृष्णा आणि वारणा नदीत मिसळते त्याचा परिणाम म्हणून मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. नदी पात्रात मृत माशाचे ढीग च्या ढिग दिसून येत आहेत.

ज्या कारखाण्याचे पाणी नदी पात्रात मिसळत आहे, त्याच्यावर तातडीने कारवाई करुन संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. नदीत प्रदूषित पाणी मिसळण्यानंतर तातडीने कारवाई करा, एकच गट्टी राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणानी परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी खराडे म्हणाले, संबंधितावर तातडीने कारवाई झाली नाही, हा प्रकार थांबला नाही तर आयुक्ताच्या केबिन आणि प्रदुषण नियत्रण कार्यालयात मृत मासे टाकणार असा इशारा खराडे यांनी यावेळी दिला. यावेळी नगरसेवक शैलेश अडके, संदीप राजोबा, संजय बेले, विश्वास बालिघाटे, सागर मादनाईक, प्रशांत घुगे, संदीप पुजारी, शब्बीर कलेगार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.