माणदेश एक्स्प्रेस न्यूज I दि. ०९ मार्च २०२३ I आटपाडी : आटपाडी पंचायत समितीकडे शाखा अभियंता असलेले आय. आय. बागवान याला निलंबित करण्यात आले असल्याने मनसे व अशासकीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे उत्तम बालटे यांनी २५/११/२०२२ रोजी ग्रामविकास विभागाला आय. आय. बागवान याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. यामध्ये बागवान हे कामचुकार कर्मचारी असून कार्यालयात कधीच उपस्थित नसतात. तसेच वरिष्ठांना उलट-सुलट बोलतात. त्यांची अनेक कामे टक्केवारीच्या नादात बोगस झाली आहेत. त्यांच्या सर्व कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
तर मनसेचे सांगली जिल्हा सचिव राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तळेवाडी शिंदेवस्ती येथील मॉडेल स्कूल कामाबाबत आटपाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काही दिवसापूर्वी तळेवाडी शिंदेवस्ती येथील मॉडेल स्कूल कामास भेट दिली असता यावेळी राजेश जाधव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मॉडेल स्कूल कामाबाबत असलेल्या तक्रारी प्रशासनास दिल्या होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील मॉडेल स्कूल, अंगणवाडी इमारत बांधकाम व अन्य कामातील त्रुटी तसेच ठेकेदाराला योग्य मार्गदर्शन करून कामे करून घेण्यात दिरंगाई केल्याबद्दल शाखा अभियंता आय.आय. बागवान यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
मॉडेल स्कूल इमारत, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र आणि दलितवस्ती योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले असूनही ठेकेदारांची बिले शाखा अभियंता बागवान यांनी काढून दिली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांनी बागवान यांना निलंबित केले आहे.