आटपाडी : आटपाडी पंचायत समितीकडे शाखा अभियंता असलेले आय. आय. बागवान याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील मॉडेल स्कूल, अंगणवाडी इमारत बांधकाम व अन्य कामातील त्रुटी तसेच ठेकेदाराला योग्य मार्गदर्शन करून कामे करून घेण्यात दिरंगाई केल्याबद्दल शाखा अभियंता आय.आय. बागवान यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

आटपाडी, शिराळा, जत, कवठेमहांकाळ तालुक्यांतील कामांची तपासणी केली. यावेळी अनेक ठिकाणी नियमानुसार कामे झाली नाहीत, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिरंजे यांनीही शाखा अभियंता, ठेकेदारांना दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. तरीही आटपाडी तालुक्यात मॉडेल स्कूल इमारत, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र आणि दलितवस्ती योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले असूनही ठेकेदारांची बिले शाखा अभियंता बागवान यांनी काढून दिली आहेत.
त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांनी बागवान यांना निलंबित केले आहे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयही डुडी यांनी घेतला आहे.