खटाव: खटाव येथील सख्ख्या मावस भाऊ-बहिणीच्या प्रेमप्रकरणात एक कोवळा जीवही शिकार झाला. यामुळे या प्रेमप्रकरणाच्या विनाशकारी वळणाने वांझोळी परिसर अक्षरश: नि:शब्द झाला. नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रेमाविषयी वांझोळी परिसरात प्रेम म्हणजे नेमके काय असंत अशी चर्चा सुरू झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या स्नेहलने आपल्या नवीन संसाराची स्वप्ने उराशी बाळगली होती; पण माहेरी आलेल्या स्नेहलला किंचितशीही कल्पना नसेल की पुन्हा आपण सासरी जाणार नाही. आणि मावस बहिणीच्या प्रेमात पूर्ण संतुलन बिघडलेल्या दत्तात्रयने मात्र तिला संपविण्याची पुरती तयारी केली असल्याचे दिसून आले.
दत्तात्रयने स्नेहलला जिवे मारण्याचा अगोदरच डोक्यात कट शिजवीला होता. त्यासाठी त्याने चाकू व कोयता खरेदी करून ठेवला होता. तर पँटच्या खिशात चाकू ठेवण्यासाठी जागा करून ठेवली होती. घटनेच्या वेळी घराच्या कट्ट्यावर सर्वजण बोलत बसले होते. त्यानंतर दोन्हीही आई गेल्यानंतर दत्तात्रयने स्नेहलला ओढत आत नेले असावे.
कारण त्या कट्ट्यावर बांगड्या पडल्या होत्या. विशेष म्हणजे स्नेहल अडीच महिन्यांची गरोदर होती. हे ऐकल्यावरच त्याच्यात सैतान निर्माण झाला. दत्तात्रयने क्षणाचाही विचार न करता स्नेहलच्या पोटावर सपासप असंख्य वार केले. तर इतर ठिकाणीही वार केल्यामुळे तिच्या पोटातील बाळासह दोन जीवांचा अंत झाला. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
