मुंबई: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हादरली होती. या हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनावर ताज्या आहेत. त्यात आता पुन्हा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं समोर येत आहे. चीन हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचं त्यात म्हटले आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व आधारकार्डची कॉपीही NIA कडून पोलिसांना मेल द्वारे पाठवलेली आहे. या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे.
अलीकडेच NIA ने खलिस्तान आणि लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटप्रकरणी कारवाई करताना ७६ ठिकाणी छापे टाकले असून, यात मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय संशयिताला समन्स देत त्याची एनआयए टीममकडून चौकशी केली जात आहे. हा संशयित इमिटेशन ज्वेलरीचा व्यापारी आहे आणि तो चीनमधून या ज्वेलरीची आयात व निर्यात करतो. हा पैसा हवालामार्गे अतिरेक्यांना पुरवला जात असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.