अहमदनगर : जिल्ह्यातील कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेच्या फिर्यादीवरून काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचून रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करुन तेथे उपस्थित परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तहसीलदार ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचारी कामावर हजर असतात की नाही हे पाहण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला असल्याची फिर्याद परिचारिकेने दिली आहे. या तक्रारीनंतर कोपरगाव पोलीस ठाण्यात विजय बोरूडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तर तहसीलदार विजय बोरूडे हे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचारी कामावर हजर असतात की नाही याची झाडाझडती घेत होते. त्यामुळे आपल्यावर कारवाई झाली तर काय होईल या भीती पोटी तहसीलसदारांवर मुद्दाम गुन्हा दाखल झालाय का? असाही प्रश्न निर्माण उपस्थित केला जात असून यावरून आता जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे.