माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीस दोन वेगवेगळ्या खटल्यात एक वर्षाची व तीन महिन्यांची शिक्षा आटपाडी न्यायालयाने ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथील सिद्धनाथ चित्रमंदिरचे मालक शंकर तुकाराम कदम (मयत) यांना त्यांच्याच लॉजवर मॅनेजर असणारा उत्तम शंकर माळी याने उसनवार रकमेपोटी ९ लाख रुपयांचा धनादेश दिलेला होता. तो धनादेश वटला नाही म्हणून मयत शंकर कदम यांनी २०१८ साली ॲड.चेतन जाधव यांचेमार्फत आटपाडी फौजदारी न्यायालयात खटला दाखल केलेला होता. त्याचा निर्णय होऊन आटपाडी येथील फौजदारी न्यायाधीश मा.विनायक पाटील यांनी आरोपी उत्तम माळी यास १२ लाख ४९ हजार रुपयाचा दंड करून एक वर्षाची साधी शिक्षा सुनावली. तसेच दंड नाही भरला तर पुन्हा तीन महिन्याची साधी शिक्षा सुनावली आहे.

तसेच संजय आप्पासो बाबर रा. चोपडी यांना देखील आरोपी उत्तम माळी याने उसनवार रकमेपोटी तीन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश वटला नाही, म्हणून संजय बाबर यांनी आरोपी उत्तम माळी याच्याविरुद्ध आटपाडी फौजदारी न्यायालयात खटला दाखल केलेला होता. त्याचाही निर्णय होऊन न्यायाधीश पाटील यांनी आरोपी उत्तम माळी यास तीन महिन्याची साधी तुरुंगवासाची शिक्षा व रक्कम रुपये चार लाख ४५ हजार रुपयांचा दंड सुनावलेला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद सुनावलेली आहे.या दोन्हीही खटल्यांचे कामकाज ॲड.चेतन व्ही. जाधव यांनी पाहिले.