मुंबई : राज्यात ८ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतःहून मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच दिलेल्या निकालामुळे ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावले आहे. त्यानंतर राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ शिवसेना कार्यकर्त्या आशा रसाळ यांनी घेतली आहे. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी आशा रसाळ यांनी साकडं घातले.

‘आज महाराष्ट्रावर संकट आले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही…’ अशी शपथ रसाळ यांनी घेतली आहे.