कोपरगाव : पती पत्नीच्या वादात आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची आईनेच मारहाण करत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बाळाचा मृतदेह विहिरीत टाकला. दोन अज्ञात इसमांनी बाळाला पळवून नेल्याचा बनाव बाळाच्या आईने केला होता. पोलिसांनी घेतलेल्या संशयामुळे आईनेच बाळाची हत्या केल्याचे उघड झाले.
सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पती सूरज हा पत्नी गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. या वादातूनच गायत्रीने रागाच्या भरात आपल्या शिवम नावाच्या पाच महिने सात दिवसांच्या बाळाला मारहाण करून गळा आवळून खून केला. बाळाचा मृतदेह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत फेकून दिला.

काही अज्ञात लोकांनी येऊन मुलाला पळवून नेल्याचा बनाव केला. पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.