अमेरिका : भारतीय वंशाच्या निक्की हेली २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होऊ शकतात. निक्की यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत २०२४च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी औपचारिकपणे उमेदवारी जाहीर केली आहे. ५१ वर्षीय निक्की रंधावा हेली या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या असून त्या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या राज्यपाल होत्या. निक्की म्हणाल्या की, मी निक्की हेली असून, अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरली आहे.
रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यापूर्वी निक्की यांना दोन टप्प्यातील निवडणूक जिंकावी लागणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले आहे की, त्यांना २०२४ मध्ये उमेदवार व्हायचे आहे. आणखी काही लोक अध्यक्षपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. मात्र, मुख्य लढत ट्रम्प आणि हेली यांच्यातच होणार असल्याचे मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीच्या वेळापत्रकात दक्षिण कॅरोलिना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
