गोवा : कुटुंबीयांना न सांगता व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्यात पोहोचलेल्या जोडप्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. मृत मुलगा आणि मुलगी मूळचे उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील पालोलेम बीचवर ही घटना घडली असून या कपलचा बुडून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जीवरक्षकांच्या मदतीने या कपलला किनाऱ्यावर आणले आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. सुप्रिया दुबे (26) आणि विभू शर्मा (27) अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते गोव्यात आले होते. सध्या सुप्रिया बंगळुरूमध्ये तर विभू दिल्लीत राहत होता. सोमवारी रात्री बीचवर काही लोकांना हे दोघे फिरताना दिसले. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचंही सांगितले जात आहे. ते गोव्याला गेल्याची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना नव्हती.