उत्तरप्रदेश: कानपूर ग्रामीण परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत आई-मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस-प्रशासन गेले होते. यादरम्यान, झोपडीला आग लागली आणि यात दोघींचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यावेळी दोघींनी बचावासाठी आरडाओरड सुरू केला. पण पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी बचावासाठी काहीच केले नाही.
मैठा तहसीलच्या मडौली गावात आई प्रमिला दीक्षित (41) आणि मुलगी नेहा (21) यांच्या मृत्यूनंतर गावकरी संतप्त झाले. ग्रामस्थांनी पोलिस प्रशासकीय अधिकाऱ्यां पळवून लावले. अधिकाऱ्यांनीही पळून आपला जीव वाचवला. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरुच होता.
या घटनेनंतर कानपूरचे पोली, आयुक्त राज शेखर, डीएम नेहा जैन, एडीजी आलोक कुमार आणि इतर अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबले होते. राज्यमंत्री प्रतिभा शुक्लाही तिथे पोहोचल्या. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली, मात्र कुटुंबीयांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. दुसरीकडे, प्रमिलाचे पती कृष्ण गोपाल दीक्षित यांनी एसडीएम आणि इतर अधिकाऱ्यांवर आग लावल्याचा आरोप केला आहे.
