माणदेश एक्स्पेस न्युज
जत : तरसाचा दुचाकीवरुन पाठलाग करीत मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी वन विभागाने तिघांना अटक केली आहे. चार दिवसापूर्वी जत सीमेवरील मारोळे (ता. मंगळवेढा) येथे तरस वन्य प्राण्याची दुचाकीवरुन पाठलाग करीत हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुचाकीवरुन पाठलाग करीत असताना जखमी झालेल्या तरसाला गावात आणून काठीने मारुन हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
यानंतर वनविभागाने तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेत संशयितांची ओळख पटवून तिघांना अटक केली. अटक केलेल्यामध्ये जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथील चंद्रकांत हिंचगिरे, मलकारी हिंचगिरे व मारोळे येथील श्रीशैल जमखंडे या तिघांचा समावेश आहे. ही कारवाई सोलापुरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी.जी. हाके व श्रीमती सी.एस.वाघ यांच्या पथकाने केली.
