दहावी बारावीच्या परीक्षामध्ये अजून एक नवीन निर्णय! दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर देण्याची सवलत रद्द
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आणि पेपरफुटी आदी प्रकरणांना आळा घालण्यासाठी यापूर्वी प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वाचण्यासाठी दिली जात होती, ती सवलत रद्द केली आहे. मात्र यामुळे राज्यभरात शिक्षक, संस्थाचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अशाप्रकारचा निर्णय घेतल्याने त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतील, अशा प्रतिक्रियाही पालकांमधून आणि शिक्षकांमधून उमटत आहेत.
प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर देण्याची सवलत रद्द करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी घेऊन त्यांची माहिती दिली असती तर कोणताही संभ्रम निर्माण झाला नसता, अशा प्रतिक्रिया विविध शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत समुपदेशक आणि तज्ज्ञही देत आहेत. मंडळाने पेपरच्या आधी अर्धा तास उपस्थिती बंधनकारक केली आहे. मात्र त्यामध्ये दहा मिनिटे आधी पेपर दिला जाणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात केवळ भीतीच निर्माण होईल.
यंत्रणा अधिक सक्षम करा मंडळाला पेपर फुटीची भीती आहे म्हणून ही सुविधा बंद केली, परंतु जे दहा मिनिटांत होऊ शकते ते उरलेल्या वेळातही होऊच शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीची सुविधा रद्द करणे चुकीचेच आहे. दहा मिनिटे प्रश्नपत्रिका वाचायला मुलांना देणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मुलांची भीती दूर होऊन, त्यांना आकलन करून त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी होत असतो. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहा मिनिटे आधी पेपर देण्याची सुविधा बंद करण्याऐवजी पेपरफुटीचे प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा कडक करायला हवी, असे मत आम्हीस शिक्षक संघटनेचे समन्वयक सुशील शेजूळ यांनी व्यक्त केली आहे.