मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याविषयी पत्रकार संघटना, तसेच विरोधी पक्षाकडून होणाऱ्या मागणीची दखल घेत फडणवीस यांनी हे आदेश जारी केले.
राजापूर तालुक्यातील पत्रकार वारिशे यांचा ६ फेब्रुवारीला थार कारने धडक दिल्याने अपघात झाला. कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना ७ फेब्रुवारीस त्यांचा मृत्यू झाला. पत्रकार संघटनांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर आरोपी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली.

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी विरोधात बातमी प्रसिद्ध केल्यानेच वारिशे यांची हत्या झाली. आंबेरकर हा भूमाफिया असून, त्यानेच वारिशे यांना गाडीने धडक देत त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अखेर फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.