जळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार व फसवणूक प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिलेल्या धमक्यांचा दस्तावेज विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आला आहे. दस्तावेज सोपविणाऱ्या सूरज झंवर यांनी ॲड. चव्हाण माझ्यासकट परिवारास धोका निर्माण करू शकतात असा उल्लेखही केला आहे.
सूरज सुनील झंवर (रा. जळगाव) यांनी १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, शेखर मधुकर सोनाळकर, उदय नानाभाऊ पवार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास एसआयटी करीत आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात ॲड. चव्हाण त्यांच्या बाजूने शासनाविरोधात लढत होते. पुढे चालून रायसोनी ‘बीएचआर’च्या गैरव्यवहारात अडकले. त्यानंतर ॲड. चव्हाण यांनी राजकीय प्रभावाचा दुरुपयोग करून पतसंस्थेवर विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून घेतल्याचा दावा झंवर यांनी या तक्रारीत केला आहे.