मिरज : मिरजेतील एका खाजगी बँकेतील कर्मचाऱ्याने खातेदारांना ८७ लाखांचा गंडा घालून पलायन केले. याबाबत फसवणूक झालेल्या खातेदारांनी व बँक व्यवस्थापनाने तोहिद अमीर शरीकमसलत (रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
मिरजेतील ॲक्सिस बँकेत खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत याने ओळखीच्या खातेदारांना म्युच्युअल फंड व बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यांच्या खात्यातील रक्कम मोबाइल बँकिंगद्धारे इतरांच्या खात्यात वळवून काढून घेतली. काही ओळखीच्या खातेदारांना, ‘ बँकेने खातेदारांसाठी आणलेल्या खास योजनेत तुमची एफडी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो’, असे सांगितले होते. काही जणांना, ‘माझ्या प्रमोशनसाठी काही महिन्यासाठी बँकेत ठेवी ठेवा’, अशी गळ घालून त्यांच्याकडून रक्कम घेतली. गणी गोदड या खातेदाराचा बँक खात्याशी संलग्न मोबाइल क्रमांक बदलून त्यांच्या खात्यातील रक्कम काहीजणांच्या खात्यात वळवून काढून घेतल्याची तक्रार आहे.

सहा महिन्यात तोहिद शरीकमसलत याने अशा पद्धतीने १५ ते २० जणांना गंडा घातला असून यापैकी आठ जणांनी पोलिसात धाव घेतली आहे. याबाबत अमिना नजीर अहमद शेख (६ लाख), गणी गोदड (१२ लाख), हुसेन बेपारी (२३ लाख), शिराज कोतवाल (२३ लाख), वाहिद शरीकमसलत (११ लाख), मेहेबूब मुलाणी (२ लाख), रमेश सेवानी (१६ लाख), अनिल पाटील (२ लाख) या आठजणांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार केली आहे.
याबाबत खातेदारांच्या तक्रारीमुळे ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक साजिद पटेल यांनीही तोहिद शरीकमसलत याच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिली आहे. तोहिद याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यांत येणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. फसवणुकीच्या तक्रारीबाबत चौकशी सुरु असून याबाबत फसवणूक झालेल्या सर्वांच्या तक्रारी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यांत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.