नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशाचे मार्केटिंग करून काँग्रेस नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांचा मार्ग सुकर करून घेण्याची गरज होती. मात्र, काँग्रेस नेते अंतर्गत वादात गुंतले आहेत. आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. यामुळे जमिनीवर काम करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता चिंताग्रस्त झाला आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाची भाजपकडे असलेली जागा १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा खेचण्यात काँग्रेसला यश आले. अमरावती पदवीधर मतदारसंघात तर महाविकास आघाडी एकसंघ लढली व भाजपचे माजी मंत्री रणजित पाटील यांचा पराभव झाला. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. पुढील निवडणुकांमध्येही भाजपचा असेच धक्के देऊ, असा आत्मविश्वास कार्यकर्ते व्यक्त करू लागले होते. मात्र, हा उत्साह चारच दिवस टिकला. नाशिकमध्ये विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांच्यावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले समोरासमोर आले.
