पुणे : गेल्या आठवडाभरापासून दुपारच्या कमाल तापमानात वाढ झाली असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पुढील दोन दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर तीन-चार दिवस कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये फेब्रुवारीअखेरपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यात १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या काही भागात विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे कमाल व किमान तापमानात घट होईल, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमान रत्नागिरी येथे ३७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल सोलापूर येथेही ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर विदर्भातही अनेक शहरांमध्ये तापमान ३३-३४ अंशांच्या दरम्यान होते.
काश्यपी म्हणाले, ‘उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पुण्यात व राज्यातील बहुतांश शहरांमधील दिवसाचे तापमान आधीच वाढू लागले आहे. कोरड्या हवामानामुळे तसेच दिवसा स्वच्छ आकाश, यामुळे सौर किरणे थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत असल्याने दिवसाचे तापमान वाढले आहे. राज्याच्या काही भागात उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला आहे, ज्यामुळे कमाल तापमानातही वाढ झाली आहे. शिवाय वाऱ्याच्या कमी वेगामुळे उष्णतेचे घटकही वाढले आहेत.’