मुंबई : कापूस, सोयाबीन पिकविम्याच्या प्रश्नावर आक्रमक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत आहेत. त्यामुळे प्रशासनाचं टेन्शन वाढले आहे. शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे बुलढाणा आणि मुंबई पोलिसांनी त्यांची शोध मोहीम सुरु केली आहे.
प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आम्हाला पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम ताबडतोब द्या अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच सोयाबीन आणि कापसाला दरवाढ देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. जर आज म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर 11 फेब्रुवारीला हजारो शेतकरी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर येणार आहोत. एकतर आम्हाला आत्मदहन करु द्या, नाहीतर पोलिसांच्या बंदुकांच्या गोळ्यांनी आम्हाला शहीद करा. एकतर आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारुन टाका अशी भूमिका आमची असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबई स्थित AIC या पीकविमा कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली आहे. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत.