पुणे : बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. त्यांनी आपल्या विरोधात कुठलेही पत्र लिहिले असेल, असे मला वाटत नाही. याविषयी माझेही त्यांच्याशी काही बोलणे झालेले नाही. प्रदेश कार्यकारिणीच्या १३ तारखेला होणाऱ्या बैठकीत या प्रकरणासह अन्य विषयांवर चर्चा होईल. शेवटी घरातला प्रश्न घरातच सोडविण्यासाठी प्रयत्न करू,” असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत पटोले यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले यांनी स्पष्टीकरण दिले.

बाळासाहेब थोरात यांनी काय पत्र लिहिले त्याबद्दल मला माहिती नाही. माध्यमांना त्यांच्या पत्रातील मजकूर मिळाला तर मला सांगावे, मग मी त्यावर बोलू शकेल. थोरात हे आमचे नेते आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची १० तारखेला बैठक बोलावली होती, काही कारणामुळे ही बैठक दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पक्षाच्या पातळीवर ही बैठक होत असून, त्यात या सगळ्या प्रकरणावर चर्चा व्हावी, यासाठी मी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार आहे, असेही पटोले म्हणाले.