कर्नाटक: एका खासगी नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील मेसमध्ये अन्न खाल्ल्याने तब्बल 137 विद्यार्थी अचानक आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहे.
मंगळुरूच्या एसपींनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुमारे 137 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारीची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या.

अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबही होऊ लागले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून विद्यार्थ्यांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे एसपींनी सांगितले.
जिल्हा आरोग्य निरीक्षक डॉ. अशोक यांनी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.