चंद्रपूर : घोसरी येथे शेतातील पिकांचा डुकरांपासून बचाव करण्याच्या हेतूने जिवंत विद्युत प्रवाह लावलेल्या तारांमध्ये अडकून पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाला. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव (घोसरी) शेतशिवारात सोमवारी ही घटना उघडकीस आली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत घोसरी उपवन क्षेत्रातील नांदगाव येथील अरुण माशीरकर यांच्या मालकीचे शेत घोसरी येथील पुणेश मारोती नाहगमकर हे ठेक्याने करीत आहेत. त्यांनी शेतातील हरभरा पिकाचा डुकरांच्या हैदोसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शेतात रात्रीला विद्युत प्रवाह सुरू केला होता. परंतु, या विद्युत प्रवाहात अडकल्याने वाघिणीचा नाहक बळी गेला. ही घटना रविवारी सायंकाळी घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकरी पुणेश मारोती नाहगमकर यांनी विद्युत प्रवाहात वाघिणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच ते गडबडले. या प्रकरणी पुणेश यांचा मुलगा अंकुल नाहगमकर याने विद्युत प्रवाह सोडल्याचे लक्षात येताच वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांनी दिली.